AD

गँगरीन म्हणजे काय? / what is Gangrene?

    गँग्रीन म्हणजे काय ?



( शुगर, मधुमेह व डायबिटीज )

असलेल्या पेशंट साठी एकदम महत्वाचे

गैंग्रीन हा शब्द कधीतरी तुम्ही ऐकला असेल. डिक्शनरी मध्ये बघितल्यास 'Death and decay of a part of the body' अर्थात शरीराचा एखादा भाग सडणे किंवा मृत होणे असा Gangrene या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे.


शरीर विविध इंद्रिय संस्थांचे उतींचे बनले आहे. या सर्वांचा मूळ घटक पेशी हा आहे. पेशींना जीवंत राहण्यासाठी ऑक्सीजन तसेच ग्लुकोज व इतर पोषक पदार्थांची आवश्यकता असते. याच बरोबर चयापचयाद्वारे पेशीत तयार झालेले टाकाऊ पदार्थ पेशीतून बाहेर नेण्याची गरजही असते. रक्ताभिसरण संस्था, श्वसनसंस्था तसेच पचनसंस्था व उत्सर्जन संस्था यासाठीच कार्यरत असतात. 


सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मज्जातंतूंच्या जाळ्याद्वारे मेंदूला एखाद्या स्नायू वा अवयवाचे अस्तित्व जाणवत असते. स्नायू वा अवयवाला मेंदूद्वारे आदेश पोहोचवण्याचे आणि तेथून मेंदू पर्यंत संदेश पोचवण्याचे काम मज्जातंतू करत असतात. 


एखाद्या अपघातात इजा झाल्याने किंवा कोणत्या रोगामध्ये हे मज्जातंतू नष्ट झाले तर त्यांच्याशी संलग्न असलेले स्नायू वा अवयव निष्क्रीय होतात. त्यांना रक्तपुरवठा केला जात नाही. जणू मेंदूच्या दृष्टीने ते भाग 'परके' होऊन जातात. परिणामी स्नायूंचा आकार लहान होणे वा ते झडणे अशा गोष्टी होतात.


काही रोगांमध्ये शरीरातील शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होऊन त्यातून रक्तपुरवठा कमी होऊ लागतो किंवा बंद होतो. कधी कधी त्या अवयवातून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांमध्ये अडथळे निर्माण होऊन रक्त साचून राहते. 


धूम्रपान करण्याने होणाऱ्या थ्रोम्बोअ‍ॅन्जायटीस ऑब्लीटरन्स या रोगात पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीवर परिणाम होऊन त्यातील रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी सुरुवातीला पायाची बोटे बधीर होतात. तेथील उती नष्ट होतात. बोटे कापावी लागतात. धूम्रपान चालूच ठेवल्यास कालांतराने पूर्ण पायाला गैंग्रीन होऊन मांडीपासून पाय कापावाही लागू शकतो. रक्तवाहिन्यात अचानक येणाऱ्या गुठळ्यां मुळेही गँग्रीन होऊ शकतो. 


मधुमेहातही काही वेळा गॅग्रीन होऊ शकतो. एखाद्या अवयवावर प्रचंड दाब पडल्यास किंवा तेथे गंभीर जंतूसंसर्ग झाला, तरीही गँग्रीन होऊ शकतो. हातापायाची बोटे, हात, पाय किंवा आतड्याच्या भागाचा गैंग्रीन जास्त प्रमाणात आढळून येतात.


एकूण गँग्रीन होणे हा गंभीर प्रकार आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. धूम्रपानाचे व्यसन टाळणे, मधुमेहासारख्या रोगाचे तात्काळ निदान करून घेऊन नियमीत उपचार घेणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे वागणे आदी उपायांनी गॅग्रीन होण्याची शक्यता बरीचशी कमी करता येईल.

No comments

Powered by Blogger.